Wednesday 18 January 2017

महाराष्ट्र

महाराष्ट्र

महाराष्ट्र या शब्दाचा उगम फारच रंजक आहे. प्राचीन काळी हा प्रांत दंडकारण्य नावाने ओळखला जायचा. इथे ऋषीमुनीतपस्वी वास्तव्य करीत असत. दंडकारण्य म्हणजे घनघोर घराण्याने व हिंस्त्र श्वपदांनी व्यापलेला. पूर्वी गुन्हेगारांना आणि दुष्टांना इथे सोडले जायचे. भयाण जंगल आणि हिंस्त्र श्वापद यांच्यामुळे व्यक्ती मृत्यूतुल्य कष्ट भोगून यमसदनी जात असे.

विदर्भ, वैराट सरकत्या राजसत्ता इथे राज्य करीत असत. पुढे कालांतराने इथे राष्ट्रकूट राजघराण्याची सत्ता आली. राष्ट्रकूट स्वतःला भारत राष्ट्राचे पालनहार समाजात असत. त्यांची सत्ता त्यांच्या शिखरकाळात मध्योत्तर भारतापासून संबंध दंडकारण्य म्हणजे सध्याच्या दख्खन प्रांतावर होती. राष्ट्रकूट म्हणजे राष्ट्राच्या एकीची समर्पित अशा परिवाराचे व त्यांच्या मांडलिकांचे कूट, म्हणजे संघ होता. या घराण्याची एक शाखा कन्नौज व दुसरी सांप्रतच्या राजस्थानात स्थायिक होती. राजस्थानातील व कन्नौज येथील ती  शाखा म्हणजेच राजपूत राठोड राजघराणे.

अशी ही राष्ट्रकूटांची व्याप्ती भारताच्या बहुतांश भागावर होती. राष्ट्रकूटांच्या सेनेला राष्ट्रीक म्हटले जाऊ लागले. राष्ट्रीक म्हणजे राष्ट्रवादी/ Nationalist. या राजघराण्याच्या काळात अनेक स्थापत्य व कला यांना चालना मिळाली. पुढे या राष्ट्रकूट संचालित राष्ट्राला म्हणजेच राज्याला महान राष्ट्र, अर्थात महाराष्ट्र म्हटले जाऊ लागले. यावरून, राष्ट्रकूटांचे कार्य आणि प्रभाव लक्षात येऊ शकतो.

अशा प्रकारे दंडकारण्य प्रांत हा राष्ट्रकूटांच्या राज्यामुळे महाराष्ट्र झाला. त्यानंतरचा व विशेषकरून १७व्या शतकापासूनचा तो आजतागायत महाराष्ट्राची राष्ट्रभावना ही जगजाहीर आहे.

Saturday 14 January 2017

शिव शिव

कुणी छापिती शिवमुख ध्वजी
कुणी घालिती राजमुद्रा करी
शिवरायांची तत्वे न कळे काही
दाढी वाढवून जो तो आरशात पाही

© कर्रोफर नमुरा

Thursday 12 January 2017

जलदुर्गराज नामे सिंधुदूर्ग

मराठ्यांच्या इतिहासात मराठा आरमाराचे स्थानही अतिशय महत्वाचे आहे. यादव साम्राज्य लयाला गेल्यावर पुढे तीनशेहून अधिक वर्षे भारतात पूर्णवेळ कार्यरत असलेले समुद्री आरमार नव्हते.

आशियातील बलाढ्य सत्ता असलेल्या मुघल साम्राज्याने देखील दक्खन आणि दक्षिण भारताचा ध्यास घेतल्यानंतरही आरमार उभारण्याचा काही फारसा विचार केलेला दिसत नाही. मुघलांच्या थोडयाफार ज्या काही आरमारी मोहिमा झाल्या त्या हंगामी होत्या. अरबांची व्यापारी जहाजे भाडेपट्टीने घेऊन त्यावर हत्यारबंद अरब व मुघल सैनिक चढवून काठाकाठाने काही मोहीमा झाल्या, त्या खोल समुद्रपासून लांबच राहिल्या.

छत्रपती शिवरायांनी मध्ययुगीन भारतात समुद्राचे महत्व ओळखून आरमार उभारणी केली. त्यांच्या मदतीला व समुद्रकिनारा सुरक्षित करण्यासाठी जलदूर्गांची निर्मिती केली. त्यात अव्वल जलदूर्ग ठरला तो सिंधुदूर्ग. राजपुरकर इंग्रज व गोवेकर पोर्तुगीज यांच्या समुद्री कारवायांना त्यामुळे अंकुश बसून, तळकोकणचा किनारा सुरक्षित झाला. महाराजांनी मालवण जवळील कुरटे बेटावरील या जलदूर्गाचे नाव सिंधुदूर्ग का बरे ठेवले असावे? त्याला कारणही तसेच आहे.

सध्याच्या भारत पाकिस्तानातून ही सिंधू नदी वाहते. ही सिंधूनदी पश्चिम वाहिनी असून, गुजरातच्या उत्तरेकडील कराची जवळ समुद्राला जाऊन मिळते. सिंधूसंस्कृती ही फारच समृद्ध आणि जगातील प्रगतशील संस्कृती होती, याला आजचे विज्ञानही प्रमाण देते. ही नदी सागराला जाऊन मिळते म्हणून त्या समुद्रास प्राचीन काळापासून सिंधूसागर असे संबोधतात. अरब या ठिकाणी समुद्री मार्गाचा वापर करून व्यापार करीत असत. त्याच मार्गाने इंग्रज व इतर युरोपीय सत्ता भारतात आल्या. अरबांच्या मार्गावरून आल्यामुळे ते याला अरबी समुद्र म्हणू लागले.

छत्रपती शिवाजी महाराजांना या गोष्टीची जाण होती. आपली प्राचीन समृद्ध संस्कृती ही आपल्या राष्ट्राची अस्मिता असून ही सिंधू नदी तिचे पश्चात्यांना प्रतिनिधीत्व करते, याचे भान शिवरायांना होते. छत्रपती शिवरायांनी कधी सिंधू नदी पहिली नाही, पण रुमशान पर्यंतची राजकीय माहिती असणाऱ्या छत्रपतींना सिंधू नदी व तिचे महत्व माहित होते या बद्दल शंका असण्याचे कारण नाही. या सिंधू नदीमुळे समुद्राला सिंधूसागर हे प्राचीन नाव असून, त्यामुळे राष्ट्राच्या मानसिकतेला फार परिणामकारक आणि उत्तेजना देणारे आहे, हे तो जाणता राजा जाणून होता.

एखाद्याचा राष्ट्राचे मानसिक खच्चीकरण आणि ह्रास करावयाचा तर त्यांची संस्कृती आणि अस्मितेच्या खूणा नष्ट करणे हा पूर्वापार चालत आलेला राजकीय डाव आहे. त्यात पाश्चात्य अग्रेसर असून, समुद्रावर आपली फक्त आरमारी नव्हे तर बौद्धिक सत्ताही असणे हे गरजेचे होते. अशी नावे आणि खूणा या राष्ट्राला प्रेरित करून, त्याबद्दल आपुलकीची आणि कर्तव्याची जाणीव जागृत करतात.

त्यामुळेच, महाराजांनी खोल समुद्रात विहार करणारे निव्वळ आरमार उभारले नाही, तर त्याला साजेसे जलदूर्गही बांधले. कुरटे बेटावरील या मोक्याच्या जलदूर्गाचे शिवरायांनी नाव ठेवले, सिंधुदूर्ग. सिंधूसागरावर अधिराज्य करणारा दूर्ग या नात्याने हे सिंधूसागर आमचे आहे, हा महत्वाचा संदेश त्यांनी शत्रूंना व स्वकीयांना दिला. एखाद्या राष्ट्राच्या अस्मितेला उभारी कशी देता येईल, व मेलेले स्वत्व जसे जागे करता येईल हि महत्वाची शिकवण आपल्याला शिवचरित्रातून मिळते. गरज आहे तर ते चरित्र सजग मनाने वाचण्याची व आत्मसात करण्याची.

© कर्रोफर नमुरा | sahebefutuhatiujjam@gmail.com