Sunday 11 December 2016

महाराष्ट्राची संस्कृती आणि आपण

कालच मराठ्यांची राजधानी रायगडावर एक अनुचित प्रकार घडल्याची बातमी येऊन थडकली. शुक्रवारी रात्री काही समाजकंटकांनी चक्क राजदरबारात सिंहासनाच्या जागेवर स्थापित असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर असलेली तलवार उध्वस्त केली. काहींच्या मते हा चोरीचा गुन्हा असून काहींच्या मते चोरीच्या प्रयत्नात केलेली मोडतोड होती. पोलिसांनी चोरीचा गुन्हा केला आहे. पण हा निव्वळ चोरीचा प्रयत्न नसून एका राष्ट्रीय पुरुषाच्या प्रतिमेची विटंबना आहे. कारण काहीही असो, निव्वळ आक्रोश आणि त्रागा व्यक्त करण्यापलीकडे जाऊन याची कारणमीमांसा आपण शोधून, हे प्रकार घडण्याचे मूळ असलेली वृत्तीच नष्ट केली पाहिजे. पोलीस आणि प्रशासनाला दोष देऊन आपले इतिकर्तव्य संपत नाही.

या सर्वांच्या मुळाला जाऊन ही मानसिकता नष्ट केली पाहिजे. ज्या रायगडावर भोसले कुलोत्पन्न शिवाजी महाराज छत्रपती म्हणून अभिषीक्त झाले, तिथे खुद्द अभिषीत सदरेवर जाण्याचे धारिष्ट्य आणि प्रमाद आपण रोखला पाहिजे. आजही आपण युरोपात गेलो तर तेथे जुलिअस सीजर आणि इतर ऐतिहासिक प्रभृतींचा मान कसा राखला जातो हे शिकण्यासारखे आहे. रायगडावर सुमारे २०१३ साली महत्वाच्या ठिकाणी कॅमेरातेहळणी संच आणि छोटे नियंत्रण कक्ष उभारण्याचे प्रस्ताव पारित होत असल्याची बातमी आली होती. पण, त्याची अमलबजावणी अद्याप झालेली नाही. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चार पाच वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांच्या समाधी जवळील महाराणी पुतळाबाईंच्या समाधीवरील कुत्र्याचे शिल्प उध्वस्त केले होते. त्यानंतर, स्वयंचलित सुरक्षक यंत्रणा बसवण्याची शिवभक्तांची वाढती मागणी आली. पण आजपावेतो ती अमलात आलेली नाही. लालफितीच्या कारभारापुढे महाराष्ट्राचा अव्वल दुर्गही हतबल ठरत आहे.

पण, हा राहिला प्रशासनाचा भाग. मुळात महाराष्ट्राच्या मातीत आणि घरात अशी विकृत वृत्ती फोफावतेच कशी, हा मुळात प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचे शिरोमणी राखण्यासाठी या साधनांची आणि नियंत्रण कक्षाची गरज का भासावी? हे एक समाज म्हणून आपले अपयश आहे. जिथे भारत देशाला कलाटणी देणारी आणि रसातळाला जाण्यापासून रोखणारी क्रांती झाली, तिथे असे समाजकंटक निपजावेत, हे आपले दुर्दैव नसून अकारकत्व आहे. मुळात, जिथली धूळ आपल्या कपाळी लावण्याची योग्यता नाही तिथे आपण सारे राजरोसपणे जाऊन छायाचित्रे काढतो, विहार करतो आणि कळस म्हणजे मेघडंबरीवर चढून छत्रपतींच्या अंगाखांद्यावर हात ठेवून छायाचित्रे काढण्यात धन्यता मानतो.

मुळात, पुरोगामी म्हणविणारा महाराष्ट्र हा पाश्चात्य आणि आपल्या अभिजात संस्कृतीच्या कचाट्यात तळ्यातमळ्यात सापडलेला दिसतो. शालेय शिक्षण संपवून बहुतांश मराठी तरुण जेव्हा कॉलेजच्या शिक्षणात प्रवेश करतो, तेव्हा त्याला आपल्या संस्कृतीची थोडीफार लाज आणि उदासीनता वाटू लागते. पाश्चात्य संस्कृतीचे ग्लॅमर त्याला भांबाऊन सोडते. गडकिल्ले फिरणे म्हणजे विरंगुळा म्हणून सुरुवात होते, त्याचे पिकनिक मध्ये रूपांतर केव्हा होते, त्याचे त्याला काळात नाही. शिक्षण संपवून कॉर्पोरेट जॉब आणि नौकरी साठी परदेशवारी याच्या रम्य कल्पनेत त्याचे विचार मूळ धरू लागतात, आणि त्या संस्कृतीच्या व्याख्येत महाराष्ट्राची संस्कृती बसत नाही. पुढे कॉर्पोरेट जॉब करत असताना आणि काही परदेशवाऱ्या केल्यावर त्याला जेव्हा प्रगल्भता येते आणि पाश्चात्यांच्या राखलेली त्यांची संस्कृती आणि त्या संस्कृतीचा अभिमान जेव्हा त्यांच्या ऐतिहासिक घटनांशी उगम पावळ्याची त्याच्या लक्षात येते, तेव्हा आपल्या संस्कृती विषयी आपल्याला काहीच माहिती नाही हे उमगून, त्याचे मन आपल्या संस्कृतीचे वेध घेण्यासाठी धजावते. त्यानंतर, जेव्हा परदेशातही कुठे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र अभ्यासले जात असल्याचे कळते, तेव्हा त्याची उत्कंठा शिगेला जाऊन तो आपल्या संस्कृतीचे ज्ञान मिळवण्यास सुरुवात करतो.

दुसरा वर्ग, गावी खेडोपाडी राहून मुंबई पुण्या सारख्या शहरांकडे आसुसलेल्या नजरेने पाहत मोठा होतो. उच्च  शिक्षणासाठी किंवा नौकरी निमित्त या शहरांकडे धाव घेतो. मुंबई पुण्याच्या पश्चातलेल्या वर्गाकडे, राहणीमानाकडे आकर्षित होऊन, त्यांच्याशी साम्य साधण्याचे प्रयत्न करू लागतो. त्या नादात तो केव्हा वाहवत जातो त्याला स्वतःला समजतही नाही. मग, सिंहागडाची वारी तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची न होता, एक सहल म्हणून होते. मग, वरील दोन्ही वर्ग ज्यांना इतिहासाशी विशेष सुसंगती झालेली नसते, ते या सांस्कृतिक स्थळांकडे भूतकाळातील पडीक वास्तू म्हणून पाहू लागतात. जेव्हा त्यांना या वस्तूंची पडझड दिसते, तेव्हा त्यांचे अल्पायुत्व गृहीत धरून, कळतनकळत त्यांच्या विध्वंसास कारणीभूत ठरतात.

तिसरा वर्गही आहे, जो गडकिल्ल्यांवरील ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू आपल्याच अधीन असलेल्या असहाय आहेत हे गृहीत धरून, त्याचे विकृतीकरण, चोरी, नासधूस यात धन्यता मानतो. शिवाय, खळबळ माजवने, सामाजिक कटुता पसरवणे, विशिष्ट समाजाला बदनाम करणे असे मानत असतो. असे, अनेक कुपोषित बुद्धीचे अज्ञानी हे राजकीय व गैरसामाजीक शक्तींच्या हातचे कळसूत्री बाहुली होऊन दुष्कर्म करतात. काहींना या उपेक्षित वास्तू हे पटकन पैसे कमावण्याचे साधन दिसू लागते. कारण काहीही असो, आपण या सर्व अज्ञान आणि विकृती रोखण्यात अपयशी ठरतो, हे समाज म्हणून आपले अपयश आहे.

मुळात, आपल्या मुलांना आपण इतर मुलांच्या तुलनात्मक  स्पर्धेत झोकून देतो, आणि फक्त शालेय प्राविण्य हेच सर्वकाही असा समज देऊन त्यांना मोठे करतो, तिथेच सर्व गणीत बिघडते. लहान मुलांची कोमल मने यात कोमेजून जातात, त्यांची मती कुंठीत होते आणि त्यांची सारासार विचार शक्तीच नाहीशी होऊन जाते. त्यातून, आयुष्याच्या स्पर्धेत आलेले सुरुवाती अपयश आणि न्यूनता यामुळे असूया आणि विकृती जन्माला येते. मग, स्वतःच्या कुंठीत मतीचा वापर ते अशा असहाय आणि दुर्लक्षित वस्तूंवर घेऊन धन्यता मानतात.

मुळात, पालक आणि समाज म्हणून आपण आपल्या संस्कृती आणि सभ्यतेची ओळख शास्त्रशुद्धपद्धतीने लहानपणीच करू द्यायला हवी. त्यांची नाळ या संस्कृतीशी आणि इतिहासाशी कशी जुळलेली आहे याचे त्यांना भान मिकवून द्यायला हवे. आपल्या शिक्षण पद्धती मध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. शाळांमध्ये शिक्षणा व्यतिरीक्त जबाबदार नागरिक होणे, त्यासाठी अशा ठिकाणी कार्यशाळा घेणे आणि श्रमदान करणे या गोष्टी उपक्रमात आणणे आवश्यक आहे. सामजीक संस्थांनी या विषयी जागरूकता आणणारी तज्ञांची व्याख्यानं आपापल्या परिसरात आणि शाळांच्या मदतीने योजला पाहिजेत. निव्वळ, वार्षिक संमेलने भारावून आणि प्रदर्शने भारावून भागणार नाही. पालकांनी मुलांना ऐतिहासिक गोष्टीची पुस्तके लहानपणी आणि संदर्भ ग्रंथ तरुणपणी वाचण्याची सवय लावली पाहिजे.

फक्त, मुले सुशिक्षीत झाली ह्यात धन्यता नसून, ती सुसंस्कृत आणि जबाबदार होणे यात खरे आयुष्याचे फलित आहे, हे आपण एक समाज आणि पालक म्हणून जाणले तेव्हाच काही सकारात्मक बदल घडेल. नाहीतर, हळाळणे आणि व्यर्थ वाचाल निषेध यातून काहीच साध्य होणार नाही. कृतिशील मराठी तरुण, हाच आपला ध्येय धरला तेव्हाच आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा तो यशस्वी नागरिक होईल. हीच खरी मनुष्य जन्माची सफलता ठरेल आणि महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती जगात नावारूपाला येईल.

कर्रोफर नमुरा | sahebefutuhatiujjam@gmail.com

2 comments: