Friday 9 December 2016

महाराष्ट्राचे दुर्गवैभव आणि आपण

महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून एक समृद्ध, प्रगतीशील आणि पराक्रमी देश आहे, हे त्रिकाळ अबाधित सत्य आहे. प्राचीन काळी हा प्रांत ऋषीमुनींचे आणि महारथींचे दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम हे येथील राष्ट्रीकांचे वैशिष्ट्य राहिले आहे. अगदी कला, स्थापत्य आणि निसर्गसौंदर्य हे देखील या भूमीला वरदान ठरले आहेत. अजिंठावेरुळचे स्थापत्य तर जगाला भुरळ घालत आहेत. लोणारचे खारयुक्त सरोवर हे खगोलतज्ञ आणि वैज्ञानिक यांचे आवडते ठिकाण.

अनेक वैदिक, पौराणिक, मध्ययुगीन आणि अर्वाचीन दाखले याला प्रमाण आहेत. सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादवांच्या पराक्रमाचे, स्थापत्याचे आणि कलासंस्कृतीचे ऐश्वर्य जगजाहीर आहे. संत ज्ञानेश्वरांपासून शिगेला पोचलेली महाराष्ट्राची भक्ती परंपरा ही यादव साम्राज्याच्या सुवर्ण काळाची तसेच परकीय आक्रमणाची व जुलमी राजवटींची साक्षीदार आहे. तो हा गौरवशाली महाराष्ट्र यादव साम्राज्याच्या अस्ता पासून पारतंत्र्याच्या तीनशे वर्षांच्या दलदलीत अडकून पडला.

पण, महाराष्ट्राची पुण्य भूमी या अतिरेकाला जास्त काळ जुमाणणार नव्हतीच. ज्या प्रमाणे समधीमग्न साधक आपल्या ध्यानावस्थेतून नवीन तेजाने सजग अवस्थेत येतो, त्याप्रमाणे ऋषीमुनींची ही तपोभूमी वेरूळच्या निसर्गातून सुप्त अवस्थेतून जागृत झाले. भोसले कुळीचे शिलेदार पुढे सरदार मालोजीराजे झाले आणि शहाजीराजेच्या काळात सुलतानी अमदनीत अव्वल सरदार म्हणून ख्याती पावले.

शहाजीराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण त्यांना स्वतंत्र साम्राज्य उभे करणे दुरापास्त राहिले. यादव साम्राज्याचे गतवैभव आणि परकीय जुलमी सत्तेची जुलूम अनुभवलेल्या शहाजीपत्नी जिजाबाईसाहेब यांनी त्यातून धडे घेत आपली कूस पोसली आणि ती शिवनेरीवर परावर्तित झाली, ती बालशिवाजीराजांच्या रुपाने. तो काळ महाराष्ट्राचा सुवर्णकाळ ठरला. त्या द्रष्टया राजाने शक्ती, युक्ती आणि नीतीच्या जोरावर शून्यातून स्वराज्य निर्माण केले. "साऱ्या राज्याचे सार ते हे दुर्ग" या नेमाने राज्यभर स्वराज्याचे विणकाम आणि रयतेची सुरक्षा या दुर्गम गडदुर्गांच्या साथीने केले. कित्येक किल्ले त्यांनी हस्तगत केले, माजनूत केले, वाढवले तर कित्येक नव्याने बांधले.

सह्याद्रीच्या रुपाने निसर्गच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. त्याचा पुरेपूर व सुयोग्य वापर श्रीशिवछत्रपतींनी केला. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, मुरारबाजी देशपांडे यासारख्या अनेक मत्ताब्बर सरदारांनी या दुर्गांचा रक्षणासाठी, ते मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती स्वराज्याच्या यज्ञमंडपात दिली आणि स्वराज्याचे तेज आणि कीर्ती वाढवली. असंख्य मावळे शिलेदार यांनी हे स्वराज्याचे दीपस्तंभ राखण्यासाठी आपले प्राण गमावले. प्राणांचे मोल देऊन हजारो मराठ्यांनी राखलेले हे गडकिल्ले हे महाराष्ट्राची जिवंत अस्मिता आणि शान आहेत, मराठयांच्या धगधगत्या इतिहासाचे जिवंत किर्तीस्तंभ आहेत.

पण, आज हेच गडकिल्ले विपन्नावस्थेत आहेत. आणि, नाही राजकारण्यांना शब्दाने बडवणे हे काही या लेखाचे उद्दिष्ट नाही, कारण आमचे मते ते समाजमनाचेच प्रतिबिंब आहेत. समाज आणि शिवाजी महाराजांचा स्वाभिमान बाळगणारे आणि त्यांचे तस्वीरी, पुतळे घराघरात, चौकाचौकात लावणारे आपण, जाय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांपुढे जाऊन काय करत आहोत?

तर, आपण (म्हणजे आपल्यापैकी अनेक जण) गड किल्ल्यांचे चिरे घर बांधण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, किंवा कुंपण बांधण्यासाठी वापरत आहोत; गडावरच्या मुर्त्या, तोफा एकतर गडाखाली ढकलून वीरश्री मानत आहोत किंवा  त्या आपल्या घरी, शेतात नेऊन त्यांची विल्हेवाट लावत आहोत; महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांची शोभा असलेल्या मुर्त्या, नाणी, शस्त्रे ऐवज एकतर आपल्या घरच्या मालमत्ता झाल्या आहेत किंवा तस्करांमार्फत परदेशी संग्रहालयात पोचत आहेत. आणि, हे सर्व कमी पडते म्हणून का काय आपण तटाबुरुजांवर आपले, आपले प्रेयसींचे नाव गिरवून मोकळे होतो. गेल्या तीन वर्षात मुंबईजवळील आसनगाव, शहापूर येथील किल्ले माहुली येथील अवजड नंदी व इतर काही मुर्त्या गहाळ झाल्या आहेत. या किल्ल्याला शाहजीराजे भोसले आणि शिवाजी महाराजांचा इतिहास लाभला आहे. काय दुर्दैव!

आपल्यापैकी बहुतांश जणं गडकिल्ले जातो, छायाचित्रे काढतो व अरेरेरे करत ती छायाचित्रे सोशियल मीडियावर टाकून 'हे थांबलेच पाहिजे' वगैरे शेरेबाजी करून काही काळाने विसरून जातो. काळाच्या बलवत्तरतेने व निसर्गाच्या ऊन, वारा, पाऊस या नियमांना सोडले तर बाकी आपल्या दुर्गांची अवदशा जी  काही झाले ती आपणच केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे डोळे हा विषय निघाला की पाणावतात व ते सद्गतीत होतात. "गडकिल्ले यांच्यावर विपुल लेखन करून मी आणि गोनीदांनी अपराध केला आहे. आमच्यामुळेच लोक गडकिल्ल्यावर जाऊ लागले व हे सर्व घडत आहे" असे उद्वेगपूर्ण स्वतःच्या मनाला हे इतिहासतपस्वी दुषणे देऊ लागतात, तेव्हा त्यांची अवस्था बघवत नाही. वास्तविक आमचे मते बाबासाहेब, अप्पासाहेब दांडेकर यांच्यामुळे किल्ले मूक मरण मारणार नाहीत हे चांगले झाले, पण पुढे ते होत असताना आपण आपली पायरी विसरून आपल्या सोन्यासारख्या दुर्गसंपत्तींची माती करत आहोत.

हल्ली बरीच मंडळी संस्था उभारून दुर्गसंवर्धन करीत आहेत, ही चांगली बाब आहे. पण, साजूकमनाने व नितीमत्तेने गडकिल्ले संवर्धन करणारे कमीच. आपण संवर्धन करीत असलेले सदर किल्ले आणि त्या गडकिलल्यांवर सापडणारा ऐवज आपल्या पूर्वजांची मालमत्ता असल्यासारखे वागत आहेत. बहुतेक प्रत्येकाने आपापले क्षेत्र वाटून घेतले आहे, त्यावर मक्तेदारी असल्यासारखी फुशारकी मिळवणारे भाष्य करीत आहेत. ते कमी म्हणून कि काय एकमेकांना कमी लेखणे आणि एकमेकांवर चिखलफेक करणे, अगदी सार्वजनिक व्यसपीठांवर सुरु आहे. हे चित्र भयानक असून अहमहमिकेला खतपाणी घालणारे ठरेल. किल्ल्यावर मिळणारे जिन्नस म्हणजे आजोबांचा वारसाच असल्यासारखे वागत आहेत.

बरे, इतिहासतज्ञ आणि पुरातत्वतज्ञ हेही मूग गिळून गप्प आहेत. प्रसंगी अपमान आणि मुजोरी करणाऱ्या संस्थाना ज्ञान देण्यापेक्षा आपण बरे आणि आपले काम बरे हे तंत्र त्यांनी अवलंबलेले दिसते. त्यांना दोष देता येत नाही, कारण त्यांच्या आवाजाला समाजाचा प्रतिसाद मिळत नाही. पुरातत्व विभाग आणि सरकारने यात लक्ष घालून १ मे १९६० सालची स्थिती आणि आजची स्थिती यांचे ऑडिट केले पाहिजे. संबंधित संस्था आणि कार्यकर्ते यांना नियमात आणून जबाबदार संवर्धन आणि संग्रह करण्यास भाग पाडले पाहिजे, तरच हा महाराष्ट्राचा दुर्गवरसा टिकेल.

जो आपला इतुहास विसरतो, तो आपला भविष्य धोक्यात घालतो, ही प्रसिद्ध उक्ती लक्षात ठेवली पाहिजे. महाराष्ट्राचा तरुण आणि विवेकी वर्ग जुनेजाणत्यांचा अनुभव घेऊन या बाबत काही करतील तोच आधुनिक महाराष्ट्राचा नवे पर्व ठरेल.

कर्रोफर नमुरा | sahebefutuhatiujjam@gmail.com

No comments:

Post a Comment